बाप रे… ! शाळेचा पहिला दिवस आणि
पहाटे पासुनच पडणारा संथ पाऊस ….
उबदार अंथरूण -पांघरूण सोडण्याचा आलेला कंटाळा
आर्त स्वरात ऐकू येणारी आकाशवाणीवरची गाणी….
खरं तर काहीच कारण नसताना उगाचच वाढणारी हुरहूर
स्वयंपाकघरातुन येणारे डब्याच्या तयारीचे आवाज…
भरपूर सुट्टी मिळाल्याने खरंतर शाळेची वाटणारी उत्सुकता…
पण त्यात मैत्रीणींना भेटायची ओढ जास्त
सुट्टीतली धमाल सांगायची ,
गळ्यात गळे घालुन विनाकारण भटकायचं ,
नवीन पुस्तकांचा-वह्यांचा ऊर भरून वास घ्यायचा
हे सगळं खूप मस्त आहे पण….
गणित-भूमितीचा तास,दफ्तर भरणं , रसायनशास्त्राची सूत्रं
जीवशास्त्राच्या आकृत्या , डब्यात नावडती भाजी
हे सगळं रटाळ ……
रेनकोट न घालताच भर पावसात सुसाट सायकल चालवत जाणं
प्रार्थनेच्या आत वर्गात पोहोचण्याची धडपड…
नाहीतर उठाबाश्या आणि मैदानाला राउंड मारणे ओघानेच …….
वेगवेगळ्या भाषेतील सुंदर चालीच्या प्रार्थना अन गाणी ..
शाळेची चार माजली इमारत , अत्यंत सुस्वरूप अशा मुख्याध्यापिका बाई
ओलसर अंगाने एकाच बेंचवर तिघींनी बसणं....
दफ्तर ठेवण्याची अडचण होत असतानाही घट्ट मैत्रिणीच्या जवळ बसण्यातले सुख……
तास सुरु असतानाच काही सिक्रेट सांगण्याची घाई आणि हळूच उघडलेला डबा
खरंच न संपणाऱ्या गोष्टी……
शाळा संपून इतकी वर्षे झाली .....
तरीही दरवर्षी जून मधे हे सगळं हृदयाच्या कप्प्यातून बाहेर येतंच .....
अचानक एखादया सकाळी आता उठून शाळेला जायचंय कि काय असं वाटू लागतं….
धडधडायला लागतं ……
No comments:
Post a Comment