Tuesday, 3 July 2012

चिंब पाऊस

कोसळणारा पाउस आणि चढत जाणारी रात्र ...
एकाच छत्रीत चिंब भिजणारे आपण दोघे आणि गरमागरम गोड कणीस.....ते हि दोघात एकच....
यंदाचा आपला पहिला पाउस.....आनंदाने चिंब भिजवणारा.....     

Monday, 2 July 2012

सुगंध आठवणींचा ....



ध्यानीमनी नसताना काल संध्याकाळी अचानक 
काही आठवणींचा सुगंध दरवळू लागला ........
काय झालं बरं नेमकं की मनात खूप आनंद दाटला 
त्या इवल्याशा चायनीज परीचा गोड स्पर्श की 
कलत्या संधीप्रकाशात येणाऱ्या वाऱ्याच्या शीतल झुळुका ....
की थंड पाण्याची अंघोळ .....!
आठवण  चंदन , मोगरा , जाईजुई , सोनचाफा , निशिगंध आणि  वाळा
यांच्या मिश्र घमघमाटाची , ओल्या सुगंधाची....!
चैत्रातल्या हळदी कुंकुवाची , पन्ह-कोशिम्बिरीच्या स्वादाची आणि
त्याच्या वासाने सगळे घर भरून राहिल्याची आठवण ...!
पाड्व्यानंतर देवाकडे होणाऱ्या संततधारेची आठवण...!
देवाकडच्या प्रसादासाठी घरी येणारे साठ साठ नारळ 
सगळ्यांबरोबर खवणण्याची आठवण......!
शुभ्र खोबऱ्याची रास , साखर यांचा भरून राहिलेला गोडसर वास....!
देवाकडे गेल्यावर मंडपातून-गाभाऱ्यातून येणारा केशर-कस्तुरीचा सुगंध.... !
बायकांच्या नवीन कपड्यांचा , केसात माळलेल्या गजऱ्याचा आणि फुलांचा गंध....!
रुद्राची  आवर्तने संपताना दक्षिण द्वारात झालेली प्रचंड गर्दी....शंखतीर्थ अंगावर 
घेण्यासाठी शिगेला पोहोचलेली उत्सुकता.....आणि मग मंडपातील पुजाऱ्यांनी
त्या शंखोद्काचा केलेला अक्षरशः वर्षाव......!! चिमटीपेक्षा थोडा जास्त मिळणारा 
साखर खोबऱ्याचा प्रसाद...! त्यासाठी मैत्रिणींसोबत केलेली पळापळ.....!!
उन्हाळ्याच्या सुट्टीत दुपारी सगळे झोपल्यावर हळूच उठून काहीतरी 
खुडबुड करण्याची आणि माठातलं वाळा आणि एखादं मोगऱ्याच फुल घातलेलं
थंड पाणी पुन्हा पुन्हा पिण्याची आठवण......!
खालच्या घरातल्या कोणत्याही ऋतूत थंड असणाऱ्या खोल्यांमध्ये 
अंधार भूडूक्क करून आई-आज्जी बरोबर झोपल्याची आठवण.......!
पहिल्या वळवाच्या पावसाच्या ओढीची आठवण.....तो अजून का येत नाहीये
म्हणून लागलेली हुरहूर.....आणि एक दिवस काहिली काहिली होत असताना 
अचानक बदललेलं वारं , उडणारा धुरळा , भरून आलेले ढग , त्यांचा गडगडाट
यांची आठवण...! क्षणातच सगळं वातावरण बदलून टाकून आलेला पाऊस....!
घराबाहेर जाऊन त्याचा पहिला थेंब अंगावर घेण्याची धडपड......!
आकाशाकडे तोंड करून ते थेंब तोंडातही घेण्याची तडफड .....आणि मग तो 
आनंद घेत  असताना येणारा मातीचा सुवास.......कितीही उर भरून घेतला तरी 
समाधानच व्हायचं नाही......गोल गोल फिरत "ये रे ये रे पावसा" किवा "वाऱ्या वाऱ्या भिंगोऱ्या"
म्हणणं.....! गारांचा पाऊस पडला तर आणखीनच मज्जा ..... त्या जास्तीत जास्त 
वेचण्यासाठीची धावपळ.....मातीत पडलेल्या गारा फ्रॉकला पुसून तसंच खाणं....!
कागदाच्या नावा करून त्या पाण्यात सोडणं , 
आणि मग घरात येऊन खिडकीतून नदीत पडणारा पाऊस अनुभवणं .....!
आठवणी......पावसाच्या .....!! अशाच वळवाच्या कोसळणाऱ्या एका पावसात 
छोट्या मैत्रिणीसोबत नदीच्या घाटावर जाऊन चिंब पाऊस झेलणं.....पागोळ्या बघणं ...!
रात्री पडणारा पाऊस , त्याचा पत्र्यावर आणि रस्त्यावर होणारा आवाज हे सगळं उबदार 
पांघरुणातून अनुभवणं.....पाऊस असाच पडत राहावा आणि सकाळ होऊच नये असं वाटणं...!
आठवतंय सखी तुला...? आपण F.Y. मध्ये  असताना केलेली पावसातली धमाल ....! इंग्लिशच्या 
क्लासला जायच्या तयारीत आपण असताना , अगदी अचानक भरून आलेलं आभाळ , 
सुटलेला प्रचंड वारा , क्लास आता होणार नाही हे माहित असूनही घरातून बाहेर पडलेल्या आपण....!
दोघीत मिळून घेतलेली  एकाच छत्री......आणि घरापासून काही पावलांवर जातोय तोच कोसळणारा पाऊस....!
काही वेळातच रस्त्यावर सामसूम झालेली....पाण्याचे पाट वेगाने धावत होते , रस्त्यावरचं वाढत जाणारं पाणी
आणि वाऱ्यात-पावसात कशीबशी तग धरलेली छत्री ....तरीही आपण जातच होतो....पाऊस झेलत....!
तासाभराने घरी परत आल्यावर काकूंच्या हातची गरम वाफाळलेली कॉफी....तो कॉफीचा मस्त गंध.....!
एकदा तर पावसात आपण चाट खायला गेलो होतो.....त्या चाटच्या टपरीवर प्लास्टिकच्या छतातून
गळणाऱ्या धारा , पडणारे मोट्ठे थेंब आणि खाली गरम गरम चाट खाणाऱ्या आपण.....आठवतंय तुला..?
आठवण....आणखी एका खास पावसाची.....लग्न ठरल्यावर पण व्हायच्या आधी भावी नवऱ्याबरोबर
एका  संध्याकाळी एकत्र फिरत असताना अचानक आलेल्या पावसाची....!! पहिल्यांदाच त्याच्या बरोबर 
पावसात  भिजण्याची अनुभूती ...... दोघांनाही झालेला आनंद व्यक्त न करता येण्याची स्थिती....!!
आठवणी....आयुष्य भारून  टाकणाऱ्या .........!!